लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना येथील जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात शनिवारी सायंकाळपर्यंत १०९ संशयितांना दाखल करण्यात आले होते. स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आल्याने ६९ जणांना तर इतर ४ जणांना उपचारानंतर प्रकृती स्थिर झाल्याने डिश्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.जालना जिल्ह्यात १२ मार्च रोजी कोरोना विषाणूचा संशयित म्हणून पहिला रूग्ण समोर आला होता. मात्र, प्रारंभीपासून आजवर सर्वच रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना डिश्चार्ज देण्यात आला आहे.जालना येथील जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात आजवर १०९ रूग्ण दाखल झाले होते. त्यातील ७६ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. पैकी ६९ जणांचा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना डिश्चार्ज देण्यात आला आहे. तर इतर चार रूग्णांची प्रकृती उपचारानंतर स्थिर झाल्याने त्यांनाही डिश्चार्ज देण्यात आला आहे. शनिवारी चार संशयित जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल झाले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालयीन सूत्रांनी सांगितले.डिश्चार्ज दिलेल्या आणि विदेशातून आलेल्या १०९ पैकी १०७ जणांचे त्यांच्या घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. इतर शहरे व राज्यातून आलेल्या ७४९ व्यक्तींचे तपासणीअंती घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १५ संस्था अलगीकरणासाठी निवडल्या असून, त्यामध्ये १५३९ खाटांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
१०९ संशयित विलगीकरण कक्षात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 12:14 AM