परतूर / घनसावंगी : परतूर व घनसावंगी बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. परतूर येथील ९५.३२ टक्के तर घनसावंगीतील ९५.५० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ अपवाद वगळता, ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
परतूर बाजार समिती निवडणुकीत ६ जागा बिनविरोध झाल्या होत्या. १२ जागांसाठी ही निवडणूक पार पडली. आ.बबनराव लोणीकर, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी आपसात जागा वाटप करून घेऊन, या निवडणुकीतील चुरस संपुष्टात आणली होती. शुक्रवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत परतूर बाजार समिती निवडणुकीत १,००४ मतदारांपैकी ९५७ मतदारांनी मतदान केले. याचे सरासरी प्रमाण ९५.३२ टक्के आहे. या निवडणुकीत सर्वाधिक मतदान ग्रामपंचायत मतदार संघात ९७.४१ टक्के मतदान झाले, तर सर्वात कमी व्यापारी मतदार संघात ९२.४४ टक्के मतदान झाले. या निवडणुकीसाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रणव वाघमारे सचिव आर.बी. लिपने यांनी काम पाहिले.
घनसावंगी बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, शिवसेना अशी काट्याची टक्कर झाल्याचे चित्र आहे. राजेश टोपे, हिकमत उढाण, सतीश घाटगे यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शुक्रवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत २,१३१ मतदारांपैकी २,०३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सहकारी संस्थांमधून ७१० मतदारांपैकी ६९१ मतदारांनी मतदान केले. ग्रामपंचायतीमधून ८४९ मतदारांपैकी ८२३ मतदारांनी आपला हक्क बजावला. व्यापारी व आडत्यांमधून ३०४ मतदारांपैकी २८३ मतदारांनी मतदान केले, तर हमाल व मापाडीमधून २६८ मतदारांपैकी २३८ मतदारांनी मतदान केले. सरासरी एकूण ९५.५० टक्के मतदारांनी मतदान केले.