बदनापूर - तालुक्यातील चनेगाव शिवारातील एका शेतात उत्पादना करण्यास प्रतिबंध केलेल्या अफूची लागवड केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी येथील शेतात धाड टाकून लसून पिकात लावलेली जवळपास २४ लाख रुपये किंमतीची ९६ किलो वजनाची अफुची झाडे बुधवारी रात्री जप्त केली.
पोलिसांना चनेगाव शिवारातील एका शेतात अफूची लागवड करण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली. यावरून बदनापूर पोलीस स्टेशनचे पोनि मारोती खडेकर, सहापोनि आय.एम. शेख, पोहेकॉ बुनगे, काळुसे मोरे, दासर, बम्हणावत, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि नागवे, पोउपनि राजपुत पोहेकॉ हजारे, तंगे, लोखंडे, किशोर जाधव यांच्या पथकाने चनेगाव शिवारात धाड टाकली. यावेळी चांदईकडे जाणाऱ्या पांधी रस्त्यावरील गट क्र. ९१ मधील शेतात अफूची लागवड करण्यात आल्याचे उघडकीस आले. मोबाईल फॉरेन्सीक लॅबचे पोकॉ रविराज खलसे यांनी तपासणी करून यास दुजोरा दिला. पोलिसांनी ९६ किलो २०० ग्राम वजनाची अफूची झाडे जप्त केली आहेत. याची बाजारातील किंमत जवळपास २४ लाख ५ हजार रुपये आहे. कारवाई दरम्यान, नायब तहसिलदार एस. यु. शिंदे उपस्थित होते.
याप्रकरणी मारोती भिवसेन खेडकर यांच्या फिर्यादीवरून निवृत्ती गणेश शेवाळे ( रा. चनेगाव ता. बदनापूर ) याच्याविरूध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहापोनि उबाळे हे करत आहेत.