विकास व्होरकटे
जालना : कृषी विभागाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या सर्वच योजनांचा लाभ शेतकऱ्यांना एकाच पोर्टलद्वारे मिळावा, यासाठी यंदा प्रथमच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यात कृषी औजारांसाठी ६६ हजार २८० तर सिंचन सुविधांसाठी ३३ हजार ४९७ असे एकूण ९९ हजार ७१७ अर्ज महाडीबीटी पोर्टलवर आले आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे, यासाठी दरवर्षी कृषी विभागाच्या वतीने विविध योजना अनुदान स्वरूपात राबविल्या जातात. पूर्वी एका योजनेसाठी एकाच पोर्टलवर शेतकऱ्यांना नोंदणी करता येत होती. यात शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाया जात होता. शिवाय, पोर्टलवर नोंदणी करताना अनेकदा नेटवर्कचा मोठा व्यत्यय येत होता. ही बाब शेतकऱ्यांसाठी गैरसोयीची ठरत होती.
यंदा प्रथमच विविध योजनांसाठी महाडीबीटी या एकाच पोर्टलवर शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर होती. परंतु, कोरोना व पोर्टल नेटवर्कमध्ये व्यत्यय यामुळे अनेक शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करता आली नव्हती. त्यामुळे महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्यास ११ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यात जिल्ह्यातून एकूण ९९ हजार ७१७ प्रस्ताव आले आहेत. या अर्जांमधून लवकरच पुणे येथून लकी ड्रॉ पद्धतीने निवड केली जाणार आहे. यात निवड झालेल्या लाभार्थ्यांपैकी अल्प व अत्यल्प लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ५० टक्के अनुदान जमा केले जाणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
या योजनांचा समावेश
महाडीबीटी पोर्टलवरील कृषी औजारांमध्ये ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर, रोटाव्हेटर, मळणी यंत्र, पेरणी यंत्र आदी यंत्रांचा समावेश आहे, तर सिंचन सुविधांमध्ये ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन, पंप सेट किंवा मोटार आदींचा समावेश आहे. या योजनांसाठी पात्र ठरणारा लाभार्भी हा सर्वसाधारण अनुसूचित जाती व जमातीचा असणे आवश्यक आहे.