जालना : एमआयडीसीतील कर्मचाऱ्याच्या हातात असलेली १४ लाख ७० रुपयांची बॅग दुचाकीस्वार चोरट्यांनी लंपास केली. ही घटना सोमवारी दुपारी ११:३० वाजण्याच्या सुमारास घडली असून, चोरट्यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.
जालना एमआयडीसीतील ‘तिरुपती ट्रेडर्स’ येथून १४ लाख ७० हजार रुपयांची रक्कम घेऊन कर्मचारी योगेश राजेंद्र मालोदे, संतोष नळलकर हे भाग्यलक्ष्मी कंपनीकडे पैसे जमा करण्यासाठी जात होते. ते दोघे ओम साईराम कंपनीजवळ आले असता तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या हातातील बॅग हिसकावून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक तुषार दोशी, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर, चंदनझिरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चैनसिंग घुसिंगे, गणेश झलवार, राजेंद्र वाघ, मनसुख वैताळ, गोकुळसिंग कायटे, धनाजी कावळे, कृष्णा तंगे, सोमनाथ उबाळे, साई पवार आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या भागातील सीसीटीव्ही तपासण्यात आले असून, विविध मार्गांवर डीवायएसपी, गुन्हे शाखा व चंदनझिरा पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणात योगेश मालोदे यांच्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.