मंठा (जि. जालना) : भरधाव मालवाहतूक वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्यानंतर पेटलेल्या कारमध्ये होरपळून एका महिलेचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मंठा शहराजवळील हिवरखेडा पाटीजवळ घडली.
सविता अमोल सोळंके (वय-३३ रा. लिंगसा कऱ्हाळा ता. परतूर) असे मयत महिलेचे नाव आहे. लिंगसा कऱ्हाळा येथील अमोल गंगाधर सोळंके (३५) व त्यांच्या पत्नी सविता सोळंके हे गुरुवारी रात्री शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शन घेऊन कारमधून (क्र.एम.एच. २१- ए.एक्स.७७५५) गावाकडे निघाले हाेते. त्यांची कार मंठा शहराजवळील हिवरखेडा पाटीजवळ आली असता पाठीमागून आलेल्या मालवाहतूक वाहनाने जोराची धडक दिली. अपघातानंतर अमोल सोळंके यांनी कारमधून बाहेर येत संबंधित वाहन चालकाला जाब विचारला. त्यांच्यात चर्चा सुरू असताना अचानक कारला आग लागली. कारला आग लागताच संबंधित वाहनचालक फरार झाला.
कारने मोठा पेट घेतल्याने अमोल सोळंके यांना काहीच करता आले नाही. डोळ्यासमोर कारमध्ये होरपळणाऱ्या पत्नीला वाचविण्यासाठी अमोल सोळंके यांनी मंठा शहरातील नातेवाईक जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष किसनराव मोरे, माजी उपनगराध्यक्ष बालासाहेब बोराडे, गटनेते अचित बोराडे, प्रताप वायाळ, कल्याण वायाळ यांना मोबाईलवरून संपर्क केला. नातेवाइकांनी अग्निशमन दलाला माहिती देत घटना स्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच मंठा पोलिस ठाण्याचे पोनि. संजय देशमुख, उपनिरीक्षक बलभीम राऊत, पोकाॅ. श्याम गायके, राजू राठोड, होमगार्ड बालू राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे प्रमुख आसेफ तांबोळी, प्रवीण राठोड, सतीश चव्हाण, अंजित चव्हाण यांनी आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत सविता सोळंके यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मंठा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुलासाठी करीत होते शेगाव वारीसोळंके दाम्पत्याला मूलबाळ नव्हते. त्यामुळे ते दर गुरुवारी वारीसाठी शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला जात होते. त्यानुसार ते गुरुवारी सकाळी शेगावला दर्शनाला गेले. गजानन महाराजांचे दर्शन घेऊन गावाकडे येत असताना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात सविता सोळुंके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात होणार शवविच्छेदनपोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यावेळी सविता सोळंके यांचे शरीर जळाल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळावरील अवशेष जमा केले. परंतु, मंठा ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करणे शक्य नव्हते. त्यामुळे ते अवशेष छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.