गोंदी (जि.जालना) : अंतरवाली सराटी येथे पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी ३५० जणांवर गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली होती.
या प्रकरणात पोउपनि. गणेश त्रिंबक राऊत यांनी गोंदी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अंतरवाली सराटी येथे मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू आहे. जरांगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचाराची गरज होती. त्यामुळे पोलिस अधिकारी जरांगे यांच्यासह आंदोलकांना समजावून सांगत होते. सूचनेकडे दुर्लक्ष करीत मराठा समाजास आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मनोज जरांगे यांना आमरण उपोषण सोडू देणार नाही, असे म्हणत पोलिस अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. दंडाधिकारी व पोलिसांनी दिलेल्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करीत पोलिसांना ठार मारण्याच्या उद्देशाने दगडफेक केली.
तसेच पोलिसांची खासगी वाहने जाळून नुकसान केल्याचे पोउपनि. गणेश राऊत यांच्या तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीनुसार ऋषिकेश बेद्रे (रा.गेवराई), श्रीराम कुरणकर, राजू कुरणकर, संभाजी बेद्रे, महारूद्र आम्रुळे, राजेंद्र कोटंबे, भागवत तरक, दादा घोडके, पांडुरंग तारक, अमोल पंडित, किरण तारक, अमोल लहाने, वैभव आवटे, किशोर कटारे (रा. साष्टपिंपळगाव), अविनाश मांगदरे, मयुर औटे व इतर ३०० ते ३५० जणांविरूद्ध कलम ३०७, ३३३, ३३२, ३५३, ४२७, ४३५, १२० (ब.), १४३, १४७, १४८, १४९ व सहकलम १३५ मपोका व कलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. एकशिंगे हे करीत आहेत.