शेषराव वायाळपरतूर (जालना) : सर्वसामान्य माणूस व शेतकरी वर्गाला वेळ देणारा मुख्यमंत्री आपण ४० वर्षांत पाहिला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शेतकऱ्यांचे व गोरगरिबांचे सरकार आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याबरोबरच कृषी विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञांच्या मदतीने अधिक उत्पन्न देणाऱ्या विविध पिकांच्या वाणांची निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
परतूर येथे आयोजित हिंदुगर्व गर्जना मेळाव्यात ते बाेलत होते. या मेळाव्यास माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार हेमंत पाटील, पंडित भुतेकर, राजेंद्र ठोंबरे, प्रल्हाद बोराडे, नितीन राठोड, उद्धव बोराडे, जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांची उपस्थिती होती.
यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेची अडचण झाली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्ग काढत आपल्या रिक्षात ५० आमदार घेऊन शिवसैनिकांना न्याय दिला. सर्वसामान्य माणूस व शेतकरी यांना वेळ देणारा असा मुख्यमंत्री आपण ४० वर्षांत पाहिला नाही. जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल शहर विकासासाठी मागतील तेवढा निधी त्यांना देऊ. असे सांगून येत्या पाच तारखेला मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. अर्जुन खोतकर यांनीही विकासकामासाठी आमचे सरकार निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर बाबासाहेब चिखले, अविनाश कापसे, प्रल्हाद बोराडे, उद्धव बोराडे यांची उपस्थिती होती.