- प्रकाश मिरगेजाफराबाद: गेल्या महिनाभरापासून जाफराबाद नगर पंचायतीत सत्ताबदलासाठी गुपचुप सुरू असलेला खेळ मंगळवारी समोर आला असून नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा डॉ. सुरेखा लहाने यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. नगरपालिकेतील राष्ट्रवादी, भाजपा व अपक्ष निवडून आलेल्या एकूण १७ पैकी १२ नगरसवेकांच्या गटाने हा ठराव दाखल केला आहे.
जाफराबाद नगर पंचायत अस्तित्वात येऊन जवळपास सात वर्ष होत आले आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीतून नगर पंचायतीमध्ये काही जुने तर काही नवीन चेहरे निवडून आले आहे. राष्ट्रवादीच्या डॉ. सुरेखा लहाने यांनी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांच्या पाठींब्याच्या बळावर आपली सत्ता स्थापन केली. परंतु, वर्षभरातच त्यांना अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. नगरपंचायतीच्या १७ पैकी १२ नगरसेवकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे.
कामकाजात अनियमिततेसह भ्रष्ट्राचाराचे आरोपनगराध्यक्षा सुरेखा लहाने या कामकाजात नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत. पाणीपुरवठा योजना आणि कचरा व्यवस्थापनाच्या कामांत भ्रष्टाचार, नियमानुसार मासिक व विशेष सभा न घेता तामिल प्रतवर खोट्या सह्या घेणे, कोरम पूर्ण नसतांना सभा घेतल्याचे दर्शविणे, पदाधिकारी यांना प्रतिसाद न देता त्रास देणे, पदाचा दुरुपयोग करून आर्थिक व्यवहार करणे आदी कारणे अविश्वास ठरावात नगरसेवकांनी नमूद केले आहे.
आरोपात तथ्य नाही नगरसेवकांनी केलेल्या भ्रष्टाराच्या आरोपात काहीही तथ्य नाही. अविश्वास ठराव दाखल झाल्याबाबत अद्याप मला माहिती मिळालेली नाही.- डॉ. सुरेखा लहाने, नगराध्यक्षा जाफराबाद नगर पंचायत