टेंभुर्णी : चोरी केलेल्या वाहनांचे तुकडे करून त्याची विक्री करणारी टोळी टेंभुर्णी पोलिसांनी सोमवारी जेरबंद केली. यावेळी एका कंटेनर चोरासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या टोळीकडून अनेक वाहन चोऱ्यांचा शोध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांना पोलीस स्टेशन हद्दीत एका ठिकाणी वाहनांचे तुकडे करणे सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ठाकरे यांनी आपल्या पथकासह जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील एका डोंगराच्या पायथ्याशी छापा टाकला. त्यावेळी तेथे चौघे जण एका कंटेनरच्या चेसिसचे तीन गॅस कटरच्या साहाय्याने तुकडे करताना आढळले. यावेळी पोलिसांनी तात्काळ या चौघांना ताब्यात घेतले.
त्यानंतर कंटेनरबाबत या चौघांना विचारले असता परिसरातील एकाने तो चोरून आमच्याकडे तुकडे करण्यासाठी दिल्याचे सांगितले. त्यानुसार कंटेनर क्रमांकावरून पोलिसांनी चौकशी केली असता तो कंटेनर एमआयडीसी वाळूज येथून चोरी झाल्याचे पोलिसांना कळले. त्याबाबत एमआयडीसी पोलिस स्टेशन वाळूज येथे गुन्हाही नोंद झालेला आहे. या छाप्यात पोलिसांनी वाहनांचे तुकडे करणाऱ्या चौघांसह अन्य एक वाहन चोर अशा पाच जणांना मुद्देमालासह अटक केली असून, सर्व आरोपी व मुद्देमाल एमआयडीस पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाईही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे एपीआय रवींद्र ठाकरे, पीएसआय सतीश दिंडे, पोलिस कर्मचारी सचिन तिडके, गजेंद्र भुतेकर, आशिष तिडके, भास्कर जाधव, सागर शिवरकर, त्र्यंबक सातपुते, पंडित गवळी, गणेश खार्डे, संदीप म्हस्के आदींच्या पथकाने केली.