- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : ''केसरकर यांच्या बोलण्यातील शुभ संकेतचा अर्थ म्हणजे भाजपचं सरकार जातं, असा असावा'',असे म्हणत मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी शिवाजी महाराज यांचा मालवण येथील पुतळा कोसळल्या प्रकरणी मंत्री दिपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. छत्रपतींचा पुतळा कसा कोसळला याची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्याला कायमचं जेलमध्ये टाका अन्यथा याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. ते आज दुपारी अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी वार्तालाप करत होते.
जरांगे पुढे म्हणाले, छत्रपती शिवराय आमचे दैवत आहे. पुतळा कोसळल्याने मराठा समाजासह सर्व अठरापगड जातीच्या भावना दुखावल्या आहेत. हा धक्कादायक विषय आहे. राजकोट किल्ल्याला भेट देऊन स्मारक कसं पडलं हे बघितलं पाहिजे, अशी भावना जरांगे यांनी व्यक्त केली. त्यासाठी १ तारखेला मालवणला राजकोट किल्ल्यावर जाण्याचं ठरवणार असल्याचेही जरांगे म्हणाले. तसेच शिवरायांच्या स्मारकामध्ये राजकारण करू नये, बोलायला खूप जागा आहे. राजकारण करायला ही जागा नाही. शेवटी सगळ्यांच्या भावना दुखावल्या आहेत हे लक्षात घ्यावं, असे आवाहन जरांगे यांनी सर्व पक्षातील नेत्यांना केले.
शेतकरी देशाचा मुख्यकणा आहे. तो जगला तरच देश जगेल, आपण शेतकरी पुत्र असल्याने शेती प्रश्नांवर लढत आहोत, अशी प्रतिक्रिया देत जरांगे यांनी प्रथम मागणी मात्र मराठा आरक्षणच असल्याचे जाहीर केले.