भोकरदन : भोकरदन तालुक्यातील भिवपूर येथील जवान अभिषेक जाधव याची फ्रान्सच्या बॅरिस्टल परेडसाठी निवड झाली असून, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गेलेल्या सैन्य दलाच्या तुकडीत फ्रान्सला गेला आहे.
फ्रान्स देशात दरवर्षी ' बॅरिस्टल डे' साजरा केला जातो. या निमित्त आयोजित परेडमध्ये देश विदेशातील सैन्य दलाच्या तुकड्या सहभागी होतात. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच या परेडमध्ये सहभाग घेण्याची निमंत्रण भारताला मिळाले आहे. यासाठी भारतीय सैन्य दलाने जवानांची निवड केली आहे. यामध्ये भोकरदन तालुक्यातील भिवपूर येथील अभिषेक पंढरीनाथ जाधव या जवानाची निवड झाली आहे. या जवानाने जालना जिल्ह्याचे नावलौकिक केले आहे. १४ जुलै हा दिवस फ्रान्समध्ये राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या आयोजित बॅरिस्टल डे परेडच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भारतीय सैन्य दलाची तुकडी ही परेडमध्ये सहभागी होणार आहे.
तिसऱ्यांदा झाली निवडअभिषेक जाधव हा भिवपूर येथील रहिवासी असून, त्याचे वय २३ वर्ष आहे. त्याची इंडियन नेव्हीमध्ये निवड झालेली आहे. शिवाय, दोन वर्षांपासून त्याची दिल्ली येथील परेडसाठी निवड झाली होती. परदेशात परेडसाठी त्याची तिसऱ्यांदा निवड झाली आहे. याबद्दल त्याचे सर्वस्तरातून कौतूक केले जात आहे.
आई-वडील करतात शेतीअभिषेक जाधव याचे आई -वडील शेती करतात. त्याचे प्राथमिक शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी पब्लिक स्कुल येथे झाले. नंतर ११ वी व १२ वी भोकरदन तालुक्यातील वाडी बु येथील जवाहर माध्यमिक विद्यालय येथे झाली. नागपूर येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू असताना त्याची नेव्हीमध्ये निवड झाली होती.