जालना : हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर सळयांनी भरलेला ट्रक लूटण्याचा प्लॅन करून तो यशस्वी करणाऱ्या चार दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई मंगळवारी रात्री करमाड टोलनाका व जालना शहरातील विविध भागात करण्यात आली.
दिनेश दत्तात्रय पवार (वय २५ रा. गांधीचमन जालना), शाहीद शकिल शेख (२१ रा. मोदीखाना जालना), तेजस नरेश बीडकर (२३ रा. गोपाळपुरा बडीसडक जालना) व सिद्दीकी शेख कौसर (२२ रा. पेन्शनपुरा जालना) असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा येथील अलीम बिसम्मील्ला पिंजारी यांनी २६ एप्रिल रोजी त्यांच्या ट्रकमध्ये (क्र.एम.एच.१८- एम.३१११) जालना येथे सळया भरून राजूर मार्गे नंदूरबारकडे निघाले होते. राजूर- जालना मार्गावरील जानकी हॉटेलसमोर एक कार ट्रकसमोर उभी करून चौघे कॅबीनमध्ये घुसले. चालकास मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून हातपाय बांधत कारमध्ये टाकले. त्याला तेथून बदनापूर शिवारातील शेतात फेकल्याची फिर्याद अलीम पिंजारी यांनी हसनाबाद पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा जालना येथील दिनेश पवार व त्याच्या सहकाऱ्यांनी केला असून, तो छत्रपती संभाजीनगर येथून जालन्याकडे येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर, करमाडा येथे वेगवेळी पथके उभा करून सापळा रचला. छत्रपती संभाजीनगर येथील पथक मागे लागल्याचे लक्षात येताच पवार याने त्याचे वाहन जोरात पळविले. परंतु, करमाड येथे पोलिसांनी पवार याच्यासह शाहीद शकिल शेख, तेजस नरेश बीडकर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सिद्दीकी शेख कौसर यालाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ट्रकसह कार, दोन चाकू, मिरची पूड, पेपर स्प्रे, रोख १६ हजार ७००रूपये असा एकूण ७ लाख ४१ हजार ४२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांना हसनाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कामगिरीही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. राहुल खाडे, पोनि. सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रमोद बोंडले, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, जगदीश बावणे, रूस्तुम जैवाळ, कृष्णा तंगे, सागर बावीस्कर, दत्ता वाघुंडे, सचिन चौधरी, फुलसिंग गव्हाणे, प्रशांत लोखंडे, सुधीर वाघमारे, परमेश्वर धुमाळ, किशोर पुंगळे, रवी जाधव, कैलास चेके, सचिन राऊत, योगेश सहाने, धम्मपाल सुरडकर, रमेश पैठणे यांच्या पथकाने केली.
रांजणी शिवारात लावला ट्रकघटनेनंतर त्या आरोपितांनी तो ट्रक दाभाडी, सोमठाणा, करमाड, पिंप्री राजे, कचनेर फाटा, लासूर स्टेशन, कचनेर फाटा, अंबड, घनसावंगी, कुंभार पिंपळगाव मार्गे रांजणी शिवारात नेवून लावला. मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी तो ट्रक व इतर मुद्देमाल जप्त केला.