जालना : निवडणुकीदिवशी सुटीचा आनंद घेण्यासाठी शहरातील मतदार सहलीचा बेत आखतात; परंतु, काहीजण मतदान करण्यासाठी नेहमीच सजग असतात. हजारो किलोमीटरचा प्रवास करून मतदान करण्याचा संकल्प आयआयटी कानपूरचा विद्यार्थी रोहन पडूळकर याने केला आहे. प्रथमच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रोहन तब्बल १३०० कि.मी.चा प्रवास करून जालना शहरात येणार आहे.
एक मतदान आपले भविष्य घडवू शकते. असाच ध्यास घेतलेला रोहन पडूळकर हा प्रवासाचा मोठा पल्ला गाठून मतदानाचा हक्क बजावणार आहे. उत्तर प्रदेशातील आयआयटी, कानपूर येथे बी. टेक.च्या तृतीय वर्षाचे शिक्षण घेत असलेला रोहन पहिल्यांदा मतदान करणार आहे. आयआयटीसारख्या नावाजलेल्या संस्थेत शिक्षण घेणारा रोहन अभ्यासातून वेळ काढत खास मतदानासाठी जालना शहरात येणार आहे.
१३ मे रोजी जालना जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक नागरिकाने मतदान करावे यासाठी प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी निश्चितच मतदानाचा टक्का वाढणार आहे. देशाच्या लोकशाही उत्सवात आपणही सहभागी व्हावे या ध्यासाने रोहन पडूळकर हा मतदान करण्यासाठी येणार आहे. मतदान करण्यासाठी रोहन अतिशय उत्सुक असल्याचे त्याचे वडील आर. पी. पडूळकर यांनी सांगितले. आर. पी. पडूळकर हे जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.