वडीगोद्री : मुरूम वाहतूक करणाऱ्या टिप्परने दोन दुचाकींना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात एका दुचाकीवरील दोघे जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात पडल्याने पाण्यात वाहून गेले. तर एक दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना सोमवारी दुपारी वडीगोद्री - जालना महामार्गावरील जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर घडली.
युवराज संतोष गायकवाड (२१), महेश किशोर गायकवाड (२२, दोघे. भोगलगाव ता. गेवराई) हे दोघे जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात वाहून गेले. लहू गायकवाड (रा. शहागड ता.अंबड) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वडीगोद्रीहून शहागडकडे जाणाऱ्या भरधाव टिप्परने सोमवारी दुपारी जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर दोन दुचाकींना पाठीमागून जोराची धडक दिली. यात एका दुचाकीवरील युवराज संतोष गायकवाड, महेश किशोर गायकवाड हे दोन युवक जायकवाडीच्या डाव्या कालव्यात पडल्याने पाण्यात वाहून गेले.
तर लहू गायकवाड हे जखमी झाले. त्यांच्यावर शहागड येथील खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहन ताब्यात घेतले. जायकवाडीच्या डाव्या कालव्यात पडलेल्या दोन युवकांचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत घेतला जात होता. घटनास्थळी पोनि. सुभाष सानप, पोउपनि गणेश राऊत यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.