परतूर : जालना ते परभणी दरम्यान असलेल्या उस्मानपूर गावाजवळील रेल्वेपटरीवर देवगिरी एक्स्प्रेस येण्यापूर्वीच दगडाने भरलेला ड्रम ठेवण्यात आला होता. परंतु, लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. ही घटना बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांच्या तक्रारीवरून आष्टी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी पोहेकाँ जे. डी. पालवे यांनी दिली.
बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास मुंबईहून सिकंदराबादकडे देवगिरी एक्स्प्रेस जात होती. सात वाजेच्या सुमारास ही गाडी परतूर रेल्वे स्थानकावर उभा होती. काही वेळानंतर वेगाने देवगिरी एक्स्प्रेस परभणीकडे रवाना झाली. परतूर-सातोना दरम्यान असलेल्या उस्मानपूर स्थानकाजवळ लोको पायलटला रेल्वेच्या पटरीवर ड्रम दिसला. त्यावेळी पायलने आपत्कालीन ब्रेक दाबले. त्यामुळे रेल्वे थांबली. पायलट आणि सहायक पायलटने खाली उतरून बगितले असता, दगडाने भरलेला ड्रम दिसला. जर देवगिरी एक्स्प्रेस ड्रमला धडकली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. दरम्यान, ४५ मिनिटे गाडी एकाच जाग्यावर उभा होती. याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच, रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
जाणून-बुजून ठेवला दगडाने भरलेला ड्रम
काही दिवसांपूर्वी आसाम राज्यातील बालाकोट येथे तीन रेल्वेंचा अपघात झाला होता. यात अनेकांचा जीव गेला. या घटनेनंतरच परतूर येथील उस्मानपूरजवळ दगडाने भरलेला ड्रम एका व्यक्तीने रेल्वे पटरीवर ठेवला. हा ड्रम कोणी ठेवला. काय ठेवला याचा तपास पोलिस करीत आहेत.
पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
इलेक्ट्रिक पोल बसविणाऱ्यांनी निष्काळजीपणा करून साहित्य जागेवरच पडून दिल्या प्रकरणी परसराम सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून संशयित सुपरवायझर अभिषेक श्रीवास्तव (२४ रा. खुसराजपूर ता. जि. उनाव राज्य उत्तरप्रदेश), कॉन्ट्रॅकटर अशोक कुमार सिंग (५५), सोमा तपनव (रा. बन्नाविरा ता. करपा जि. बुट्टे राज्य झारखंड), बुद्रम तपोवन (रा.गुदगा, पोखरा, ता. कमडरा जि. गुमलांग राज्य झारखंड), हेतवा तपनव रा. गुदगा पोस्ट पाेखरा ता. कमडरा जि. गुमलांग राज्य - झारखंड) यांच्याविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेकॉ. जे.डी. पालवे हे करीत आहेत.