अंबड : घनसावंगी विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून घनसावंगी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 354 बूथच्या ईव्हीएम मशीनमधील मतमोजणी 14 टेबलवर 26 फेऱ्यामध्ये होईल. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजीमंत्री राजेश टोपे तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे हिकमत उढाण, महाविकास आघाडीतील बंडखोर अपक्ष माजी आमदार शिवाजीराव चोथे, महायुतीमधील बंडखोर सतीश घाटगे यांच्यासह अन्य 23 उमेदवार मैदानात आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. यामुळे वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडेल हे सांगणे कठीण आहे.
अंबड तालुक्यातील 53 आणि घनसावंगी तालुक्यातील 117 जालना तालुक्यातील 42 अशी असा 212 गावे घनसावंगी मतदारसंघातील समावेश आहे. घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावरील अंतिम टक्केवारी 77.16 % एवढी आहे. म्हणजेच सुमारे 2 लाख 54 हजार 880 मतदारांनी आपले मतदान केले. यात पुरुष 1लाख 34हजार 739 व महिला 1 लाख 30 हजार 121 मतदारांनी आपले कर्तव्य बजावले.
मतमोजणीच्या होणार 26 फेऱ्या उद्या सकाळी 8 वाजता घनसावंगी येथील राजेगाव रोडवरील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. एकूण 14 टेबलवर मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, सुक्ष्म निरीक्षक व वर्ग 4 चे कर्मचारी असे एकूण 116 अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त 60 अधिकारी-कर्मचारी इतर मतमोजणी विषयक कामकाजासाठी नियुक्त आहेत. तसेच 130 पोलीस अधिकारी, कर्मचारी, 24 राज्य राखीव पोलीस दल, 40 होमगार्ड तसेच स्टाँगरुम करिता 24 बीएसएफचे जवान बंदोबस्तासाठी तैनात आहेत.
टोपे आणि उढाण यांची यंत्रणा होती सज्ज माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी निवडणुका जाहीर होताच प्रचार सुरू केला होता. स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांचेच वर्चस्व असल्याने कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्याकडे आहे. तर शिवसेनेच्या हिकमत उढाण यांनी ऐनवेळी शिंदे गटात प्रवेश करून शिवसेनेला मानणारा वर्ग आपल्या सोबत ठेवण्यात यश मिळवले आहे. यासोबतच भाजपचे बंडखोर सतीश घाटगे यांनी देखील मतदारसंघ पिंजून काढत मोठे आव्हान निर्माण केले आहे.