जालना : चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून १ लाख ८२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहन चोरी प्रकरणातही एकास जेरबंद केले असून, त्याच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी शहरातील संजीवनी हॉस्पिटल परिसरात केली.
शहरातील विविध भागात महिलांचे दागिने चोरणारे चोरटे संजीवनी हॉस्पिटल परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोनि. रामेश्वर खनाळ यांना मिळाली होती. त्यानुसार पोनि. खनाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी दुचाकीस्वार दोघांना जेरबंद केले. यात अमर चिलुबाळ कांबळे (२९), फिरोज उर्फ लखन अजीज शेख (वय- ३० दोघे रा. नेवासा फाटा ता. नेवासा जि. अहमदनगर) अशी ताब्यात घेतलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्या दोघांनी चंदनझिरा, सदरबाजार (जालना), लोणीकंद (पुणे शहर) येथे चैनस्नॅचिंग केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारीच दुचाकी चोरी प्रकरणात अंबड बसस्थानकातून कैलास बाबुराव राठाेड (वय-३४ रा. गंगाराम तांडा ता. अंबड) याला जेरबंद केले. त्याने अंबड येथील चैतन्य हॉस्पिटल परिसरातून दुचाकी चोरीची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून चार गुन्ह्यांची उकल झाली आहे. शिवाय चार दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
रस्ता विचारण्याचा बहाणादुचाकीवर येवून महिलांना रस्ता विचारणे किंवा पाणी पिण्याच्या बहाण्याने गळ्यातील दागिने चोरी करण्याचा सपाटा या संशयित चोरट्यांनी लावला होता. त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आले आहेत. इतर गुन्ह्यांची उकलही होईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी व्यक्त केला.
यांनी केली कारवाईया दोन्ही कारवाया पोलिस अधीक्षक डॉ. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोनि. रामेश्वर खनाळ, सपोनि. आशिष खांडेकर, पोउपनि. प्रमोद बोंडले, पोहेकॉ. फुलचंद गव्हाणे, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद रगडे, कृष्णा चौधरी, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, बबन पव्हरे, सुधीर वाघमारे, कैलास चेके, योगेश सहाने, धीरज भोसले, सौरव मुळे, सागर बावस्कर, देविदास भोजने, अक्रुर धांडगे, दत्ता लोखंडे, पोहेकॉ. भागवत खरात यांच्या पथकांनी केली.