जालना : जालना शहरातील टीव्ही सेंटर भागात प्रमोद झिने (४०) यांचा सात दिवसांपूर्वी खून करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून एका महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा अधिक तपास केला असता, अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने प्रमोद झिने यांचा खून केल्याचे उघडकीस आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
७ मेच्या रात्री प्रमोद झिने यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणात मयताची पत्नी आशा झिने यांच्या फिर्यादीवरून एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता व तिला अटकही करण्यात आली होती. त्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते, त्यातूनच त्या महिलेने खून केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग व त्यांच्या पथकाने सखोल तपास केला असता, त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रमोद झिने यांच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून केला आहे. मयत प्रमोद झिने यांची पत्नी आशा हिचे रेवगाव येथील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते.
अनैतिक संबंधात आशा झिने आणि तिच्या प्रियकराने एक महिन्यापूर्वीच प्रमोद यांच्या खुनाचा कट केला होता. ६ मेच्या रात्री प्रमोद हे मद्यप्राशन करून झोपलेले असताना आशा झिने हिने संधी साधून प्रियकरास बोलावून घेऊन प्रमोद यांचा झोपेतच कुऱ्हाडीने वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेने मयताची पत्नी आशा झिने आणि तिचा प्रियकरास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन तालुका जालना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.