जालना : बनावट सोन्याच्या बिस्किटाचे आमिष दाखवून एका ५० वर्षीय महिलेला लुटल्याची घटना जालना शहरातील सावरकर चौक ते मामा चौकादरम्यान मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कमलाबाई बाबासाहेब पाचरणे (५०, रा. पानशेंद्रा, ता. जालना) यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती तपास अधिकारी बी. एल. आगळे यांनी दिली.
कमलाबाई पाचरणे या पानशेंद्रा येथून रिक्षाने जालना शहरात आल्या. सावरकर चौक ते मामा चौकादरम्यान त्या दुपारी एक वाजेच्या सुमारास पायी जात होत्या. तेवढ्यात दुचाकीवरून पाठीमागून दोघेजण आले. तुमच्या पिशवीतून सोन्याचे बिस्किट पडले आहे, ते आम्हाला मिळाले आहे, असे दोघेही संशयित त्यांना म्हणाले. परंतु, कमलाबाई यांनी त्यांना नकार दिला. दोन्ही भामट्यांनी त्यांना बाजुला बोलवून घेतले. तुम्ही आम्हाला एक लाख रुपये दिले तर आम्ही तुम्हाला सोन्याचे बिस्किट देऊ, असे एक जण म्हणाला. नंतर कमलाबाई पाचरणे यांनी गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची पोत आणि सात हजार रुपये चोरट्यांना दिले. त्यांनी सदरील सोन्याचे बिस्किट सोनाराकडे तपासले असता, ते बनावट असल्याचे समजले.
याप्रकरणी रात्री उशिरा कमलाबाई पाचरणे यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरूध्द सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बी. एल. आगळे हे करीत आहेत.