लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अखिल भारतीय महानुभाव सािहत्य मंडळाच्यावतीने जालन्यात २३ आणि २४ डिसेंबर दरम्यान १२ वे साहित्य संमेलन होणार असून, याचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते रविवारी दुपारी एक वाजता होणार असल्याची माहिती महंत प्रज्ञासागर महाराज आणि स्वागताध्यक्ष आ. राजेश टोपे यांनी संयुक्त पत्रपरिषदेत दिली.हे साहित्य संमेलन संभाजीनगर मधील हॉटेल बगडियामध्ये आयोजिण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या संमेलनात अनेक मान्यवर साहित्यिक आणि अभ्यासकांची उपस्थिती राहणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ सािहत्यिक डॉ. आ.ह. साळुंके हे राहणार आहेत. या दोन दिवसीय संमेलनाचा प्रारंभ ग्रंथ दिंडीने होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी विधानसभेचे अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी मंत्री कमलकिशोर कदम, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. कल्याण काळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, माजी आ. कैलास गोरंट्याल, चंद्रकांत दानवे आदींची उप्स्थिती राहणार आहे.२३ रोजी दुपारी तीन ते पाच यावेळेत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, धर्मसामंजस्य काळाची अपरिहार्य गरज या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश बडवे तर वक्ते म्हणून डॉ. यशराज महानुभाव, प्रा. बस्वराज कोरे, माजी मंत्री सुरेंद्र भुयार, प्रा. राजेश मिरगे, जैन मुनी अरूण प्रभाजी, अनिल शेवाळकर, प्रा. एम.आर. लामखेडे, ह.भ.प. पंढरीनाथ तावरे यांचा समावेश होणार आहे. याच दिवशी सायंकाळी पाच ते सात यावेळेत चक्रधरांचे सर्वोदयी धर्मजागृती यावर होणार आहे. सायंकाळी सात ते नऊ यावेळेत कविसंमेलन होणार असून, यात अनेक मान्यवर कवींचा समावेश राहणार आहे.संमेलनाचा समारोप सोमवारी होणार असून, यात दोन परिसंवाद होणार आहेत. पहिला परिसंवाद महानुभाविय वाड:मयाचे स्वरूप आणि व्याप्ती, तर दुस-या परिसंवादाचा विषय हा महानुभाविय काव्याची विविधांगी रचना असे कार्यक्रम होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी यशवंतराव चव्हाण साहित्यिक व संस्कृती प्रतिष्ठान आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचार प्रबोधनी सेवाभावी संस्थेकडून घेतले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेस प्राचार्य डॉ. बी.आ.गायकवाड, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड, प्रा. रानमाळ यांची उपस्थिती होती.
अ.भा. महानुभाव साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:52 AM