भोकरदन (जि. जालना) : शेततळ्याचे बिल काढून देण्यासाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या कृषी पर्यवेक्षकासह सीताफळ लागवडीचा हप्ता काढून देण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारणाऱ्या कृषी सहायकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी भोकरदन येथून ताब्यात घेतले आहे. उद्धव लक्ष्मण वाघ (३७, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा), विष्णू भीमराव भोपळे (३८ रा. कैलासनगर, भोकरदन) अशी संशयितांची नावे आहेत.
तक्रारदाराच्या नावे मंजूर असलेल्या शेततळ्याचे ७५ हजार रुपयांचे बिल काढून देण्यासाठी साहेबांच्या नावाने भोकरदन येथील कृषी अधिकारी कार्यालयातील संशयित कृषी पर्यवेक्षक उद्धव वाघ याने पाच हजार रुपयांच्या लाचेची पंचासमक्ष मागणी केली. तसेच तक्रारदाराच्या नावे मंजूर असलेल्या सीताफळ लागवडीचा १३ हजार रुपयांचा दुसरा हप्ता काढून देण्यासाठी भोकरदन तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहायक विष्णू भोपळे याला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले आहे.
दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलिस उपाधीक्षक किरण बिडवे यांच्यासह पोलिस अंमलदार शिवाजी जमधडे, गणेश चेके, गणेश बुजाडे, संदीपान लहाने, गजानन घायवत यांनी केली आहे.