जालना : रोजगार हमी योजनेतून शेतात फळबाग लागवडीसाठी मजूर मागणी पत्र तयार करून देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्वीकारणा-या कृषी सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ताब्यात घेतले. शाम दगडू राठोड (५५, रा. जमुनानगर) असे लाच स्वीकारणा-या कृषी सहायकाचे नाव आहे.या प्रकरणातील तक्रारदाराची बाजीउमद्र शिवारात दोन हेक्टर तीस आर जमीन आहे. शेतात रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी आवश्यक मजूर मागणीपत्र तयार करून घेण्यासाठी तक्रारदार कृषी सहायक राठोड यास भेटले. या कामासाठी राठोडने एक हजारांची लाच मागितली. लाच दिली नाही तर काम होणार नाही म्हणून सांगितले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. विभागाने पडताळणी करून शुक्रवारी अंबड चौफुली परिसरातील एका हॉटेलसमोर सापळा लावून राठोड यास तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक आ.वि. काशीद, व्ही.एल. चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, संतोष धायडे, प्रदीप दौंडे, संजय उदगीरकर, अमोल आगलावे, नंदू शेंडीवाले, रामचंद्र कुदर, रमेश चव्हाण, संदीप लव्हारे, ज्ञानेश्वर म्हस्के,खंदारे यांनी ही कारवाई केली.
लाच स्वीकारताना कृषी सहायक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 12:29 AM