लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील जाळीचादेव येथील यात्रा बंदोबस्ताचे काम पाहून पारध ठाण्याकडे निघालेले उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) सुनील जायभाये यांच्या जीपला अपघात झाला. ही घटना शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गुम्मी गावाजवळ घडली. सुदैवाने जायभाये यांच्यासह इतर दोघे किरकोळ जखमी झाले.डीवायएसपी सुनील जायभाये हे शनिवारी जाळीचादेव येथील यात्रा बंदोबस्ताचे काम पाहण्यासाठी गेले होते. तेथील कामकाज झाल्यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील गुम्मी मार्गे ते पारध ठाण्याकडे निघाले होते. त्यांची जीप गुम्मी गावाजवळ आली असता खड्ड्यात आदळली. त्यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने त्यांची जीप थेट झाडावर जाऊन आदळली आणि दोन वेळेस उलटली. या अपघातात जीपचे मोठे नुकसान झाले. पण सुदैवाने जीपमध्ये असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, अंगरक्षक नीलेश हुसे व चालक वाघ यांना मोठी इजा झाली नाही.अपघातानंतर सपोनि शंकर शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी घेऊन जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.
‘डीवायएसपीं’च्या वाहनाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 12:23 AM