जालना : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी गेल्या वर्षभरात १२० प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी ३६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे, तर २० प्रस्ताव विविध कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत. अद्यापही ६४ प्रस्ताव प्रलंबित आहेत.
शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विमा दिला जातो. यासाठी दरवर्षी कृषी विभागाकडून प्रस्ताव मागविले जातात. कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्तावांना मंजुरी दिली जाते. त्यानुसार जालना जिल्ह्यात मागील वर्षभरात १२० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ ३६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.
सर्वाधिक प्रकरणे रस्ता अपघाताची
जालना जिल्ह्यात वर्षभरात १२० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यातील सर्वाधिक ११ शेतकऱ्यांचा अपघातामुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर पाण्यात बुडून १०, सर्पदंशाने ४ तर विजेचा धक्का लागून ५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
कोणाला किती मिळते मदत
शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत २ लाख रुपयांची मदत दिली जाते, तसेच अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपयांची मदत दिली जाते.
२०२० साली मंजूर झालेले प्रस्ताव
रस्ता अपघात, वाहन अपघात ११
विजेचा धक्का ५
सर्पदंश ४
बुडून किंवा उंचावरून पडून १०
या अपघातामुळे दिला जातो विमा
शेतकऱ्याचा रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून, सर्पदंश, विंचू दंश, खून, उंचावरून पडून मृत्यू झाल्यास विमा दिला जातो. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.