दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे एक रूपया अपघात मदत निधीसाठी वसूल करते. या योजनेचा जालना विभागात एप्रिल २०१९ ते फेबुवारी २०२० पर्यंत तब्बल १६ कोटी ०२ लाख रूपयांचा निधी जमा झाला असून, ३० जखमी व ४ मयत प्रवाशांच्या वारसांना ६१ लाख ०१ हजार २९२ रूपयांची मदत देण्यात आली आहे.बस प्रवासात अथवा बसच्या धडकेत पादचारी किंवा प्रवासी मयत झाल्यास त्यांच्या वारसांना नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी १० लाख रूपयांची मदत केली जाते.राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी योजना १ एप्रिल २०१६ पासून सुरू करण्यात आली. संबंधित योजनेसाठी प्रत्येक तिकिटधारी प्रवाशाला एक रूपया अतिरिक्त शुल्क आकारण्यात येते. सुरूवातीला महामंडळातर्फे अपघातग्रस्त मयत प्रवाशांच्या वारसदाराला ३ लाख रूपये व जखमी प्रवाशाला ४० हजार रूपयांपासून ७५ हजार रूपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येत होती. या रकमेत वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे व त्यानुसार मृत प्रवाशांच्या वारसांना दहा लाख रूपये देण्याचे ठरविले. संबंधित वाढीव निधी देण्यासाठी प्रत्येक तिकिटामागे एक रूपयाची वाढ केली होती.४ प्रवाशांना थेट भरपाईएप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० या ११ महिन्यांच्या कालावधीत ४ प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. जालना विभागात ४ मयत प्रवाशांच्या वारसदारांना थेट १० लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.फुकट्या प्रवाशांना लाभ नाहीबसमध्ये अनेकदा विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. एखाद्या वेळी दुर्देवाने विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशाचा दुर्देवी मृत्यू झाला तर त्यांना ही अपघात सहाय्यता मदत दिला जात नाही.११ महिन्यांत ३० प्रवासी जखमीजालना विभागात एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत ३० प्रवासी जखमी झाले आहेत तर ४ प्रवासी मयत झाले असून, महामंडळाने या प्रवाशांच्या वारसांना जवळपास ६१ लाख १ हजार २९२ रूपये दिले आहे. मयत व जखमी प्रवाशांना न्यायालय अथवा थेट स्वरूपातही मदत केली जाते. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागातून ही आकडेवारी प्राप्त झाली आहे.
महामंडळाने जमा केला १६ कोटींचा अपघात निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:00 AM