जालना : समृध्दी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून, शनिवारी सकाळीच भरधाव कारने उभा असलेल्या कंटेनरला धडक दिल्याने एक तरूणी जागीच ठार झाली आहे. तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात समृध्दी महामार्गावरील चॅनल क्रमांक ३५७ वर घडला.
नागपूर येथील रहिवासी अंशुल टाकळीकर (२५) आणि तरुणी ओइंद्रआर रॉय (२६) हे दोघे एकाच कंपनीत काम करतात. ओइंद्रआर रॉय ही बंगळूर येथून नागपूरला आली होती. नागपूरहून अंशुल व ओइंद्रआर हे दोघे फिरण्यासाठी पुण्याला गेले होते. शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दोघेही जण कार क्रमांक (एम.एच.४९बीडब्ल्यू ०११७)ने नागपूरकडे निघाले होते. शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास समृध्दी महामार्गाने जात असतांना जालना जिल्ह्याच्या हद्दीतील चॅनल क्रमांक ३५७ वर भरधाव कार उभा असलेल्या कंटेनर क्रमांक (एमएच.३४.बीजी.६७३५) ला पाठीमागून धडकली. यात ओइंद्रआर रॉय ही तरूणी जागीच ठार झाली. तर अंशुल टाकळीकर (रा. नागपूर) हा जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जालना येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविले. क्रेनच्या साह्यायाने कार व कंटेनर रस्त्याच्या बाजूला करण्यात आळे. यावेळी महामार्गाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पना राठोड, पोलिस कर्मचारी चाटे, बिजुले, बेडेकर आणि हावळे यांची उपस्थिती होती. दरम्यान, घटनास्थळावरून कंटेनर चालक फरार झाला आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.
सलग दुसऱ्या दिवशी अपघातशुक्रवारी दुपारी समृध्दी महामार्गावर एका कारने उभा असलेल्या कंटेनरला धडक दिली. यात मायलेकीसह अन्य एकजण ठार झाला होता. तर एकजण गंभीर जखमी आहे. या घटनेनंतर शनिवारी सकाळीच महामार्गावर आणखी एक अपघात झाला आहे.