वडीगोद्री ( जालना) : मुलीच्या लग्नासाठी सुट्ट्या घेऊन घरी आलेल्या सीमा सुरक्षारक्षक दलाच्या जवानाचा भरधाव पिकअपने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अंबड तालुक्यातील भालगाव फाट्यावर घडली. हनुमान यशवंता लिपणे (४३, रा. वडीगोद्री, ता. अंबड) असे मयताचे नाव आहे. शनिवारी मुलाने काळजावर दगड ठेवून दहावीचा पेपर दिला. त्यानंतर वडिलांचे शेवटचे अंत्यदर्शन घेतले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील रहिवासी हनुमान यशवंता लिपणे हे त्रिपुरा येथे सीमा सुरक्षारक्षक दलात जवान म्हणून कार्यरत होते. २७ फेब्रुवारी रोजी मुलीचे लग्न असल्याने ते सुट्टीवर आले होते. रविवारी सुट्टी संपत असल्याने शुक्रवारी ते छत्रपती संभाजीनगर येथील एका शाळेत मुलाची फी भरण्यासाठी दुचाकी (एम. एच. २१ ए. जे. ५७९९)ने गेले होते. फी भरून ते वडीगोद्रीकडे गावी येत होते. भालगाव फाट्यावर आल्यावर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव येत असलेल्या बोलेरो पिकअप (एम. एच. ०६ ए. जी. ७५६९)ने जोराची धडक दिली. यात जवान हनुमान लिपणे हे जागीच ठार झाले. त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
दरम्यान, घटनास्थळावरून पिकअप चालक फरार झाला होता. ग्रामस्थांनी पाठलाग करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. वडिलांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मुलगा सुशांत हनुमान लिपणे याने हंबरडा फोडला. त्याचा शनिवारी दहावीचा पेपर होता. त्याने काळजावर दगड ठेवून दहावीचा पेपर देऊन वडिलांचे अंत्यदर्शन घेतले. हनुमान लिपणे यांच्यावर शनिवारी पाच वाजेच्या सुमारास वडीगोद्री येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.