तळणी (जि.जालना) : वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना मंठा- लोणार महामार्गावरील अजिसपूर पाटीजवळ गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर मयताच्या संतप्त नातेवाईकांनी सलग सात तास रास्ता रोको करीत त्या वाहनचालकाला ताब्यात घेण्याची मागणी लावून धरली होती.
शेख शिराज शेख आयुब (वय ३२, रा. अजिसपूर ता. लोणार, जि. बुलढाणा) असे मयताचे नाव आहे. मराठवाडा - विदर्भाच्या सीमा हद्दीवरील मंठा - लोणार दिंडी महामार्गावरून सर्रास वाळू वाहतूक करणारी वाहने धावतात. वाळूची वाहतूक करणाऱ्या एका वाहनाने अजिसपूर पाटीजवळ गुरुवारी सकाळी ६ वाजता दुचाकीस (क्र.एम.एम.१७-बी.सी.९२१०) धडक दिली. त्यात शेख शिराज शेख आयुब याचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ व त्या वाहनचालकाला अटक करावी, या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी सकाळी ७ वाजताच तळणी - लोणार महामार्गावरील अजिसपूर पाटीवर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. दुपारी २ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरूच होते.
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे पोलिस, महसूल, आरटीओ विभागाचे दुर्लक्ष असल्याने अपघाताची संख्या वाढत असल्याचा आरोप नातेवाईक शेख अतिक शेख चाँद, शेख रसीद शेख दस्तगीर, शेख यासीन शेख कासम, शेख मुहमद रफीक व इतरांनी केली. या आंदोलनामुळे तळणी - लोणार मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती.
रस्त्यावरून उठणार नाही...जोपर्यंत अपघातातील वाहन आणि चालक ताब्यात घेऊन कारवाई होणार नाही, तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही, अशी भूमिका संतप्त नातेवाईकांनी घेतली होती. लोणार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मेहेत्रे यांना विचारले असता, या अपघाताची चौकशी सुरू असून, लवकरच संबंधित वाहनासह चालकाला अटक केली जाईल, असे सांगितले.
पंधरा दिवसांत दुसरा बळीगत आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीमुळे तळणीतील एका दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्यात पुन्हा अजिसपूर पाटीजवळ एका दुचाकीस्वाराचा वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला.