जालना : डबल झालेल्या रिचार्जचे १ हजार ५५१ रूपये परत मिळवून देतो म्हणून एकाची ऐनी डेस्क ॲपद्वारे ९४ हजार ८२२ रूपयांची फसवणूक केल्याची घटना जालना शहरातील गोकुळनगरी येथे घडली. या प्रकरणी गणेश उदावंत यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना शहरातील भाग्यनगरजवळील गोकुळनगरी कॉलनीतील रहिवासी गणेश उदावंत यांच्याकडून बीएसएनएलच्या मोबाईलवर १ हजार ५५१ रूपयांचे डबल रिचार्ज झाले होते. त्यांनी गुगलवरून कस्टमर केअरचा क्रमांक काढला. त्यावर फोन केला असता, संशयितांनी सदरील पैसे परत मिळविण्यासाठी ऐनी डेस्क ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याप्रमाणे गणेश उदावंत यांनी मोबाईलमध्ये ऐनी डेस्क ॲप डाऊनलोड केेले. संशयितांनी सांगितल्या प्रमाणे सेटिंग केली असता, त्यांच्या खात्यातून ९४ हजार ८२२ रूपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गणेश उदावंत यांनी याची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.