जालना : घरफोडीतील एका आरोपीला सदरबाजार पोलिसांनी जेरबंद केले असून, त्याच्याकडून चोरीस गेलेले साहित्य, मॉनिटर, डीव्हीआर जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली.
जालना शहरातील एक चिकनशॉप फोडून चोरट्यांनी आतील मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणात सदरबाजर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी १३ ऑगस्ट रोजी कृष्णा वामन जाधव (रा. लोधी मोहल्ला जालना) याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून चोरीतील ५०६० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तर याच प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी राहुल तुलजासिंग राजपूत (रा. लोधी मोहल्ला) याचा शोध सुरू होता. राजपूत याला सदरबाजार पोलिसांनी शुक्रवारी जेरबंद केले. त्याच्याकडून एक डीव्हीआर, मॉनिटर, एक रिमोट असा दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. अनिरुध्द नांदेडकर, पोनि. देवीदास शेळके, गणेश झलवार, रामप्रसाद रेंगे, सुभाष पवार, समाधान तेलंग्रे, धनाजी कावळे, रामेश्वर जाधव, सोमनाथ उबाळे, योगेश पठाडे, दीपक घुगे, नसीम पठाण, कमल गिरी यांच्या पथकाने केली.