चंदनझिरा: पाणी पिण्याचा बहाणा करून पोलीस स्टेशनमधून फरार झालेला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. धम्मजित चिकटे असे आरोपीचे नाव असून त्याला जालना तालुक्यातील इंदेवाडी येथून पोलिसांनी शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले.
येथील औद्योगिक वसाहतीत कामगार पुरवणाऱ्या ठेकेदाराचा पैशाच्या देवाण घेवाणीतून खून करणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात चंदनझिरा पोलिसांना अवघ्या 12 तासात यश मिळाले होते. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर,पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह सहकारी पोलीस अधिकारी व पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी जलदगतीने तपास करून गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले होते. शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.
चंदनझिरा पोलीस ठाण्यात आणल्यानंतर श्याम उर्फ धम्मजित चिकटे रा.चंदनझिरा या आरोपीने पोलीस ठाण्यातुन पाणी पिण्याच्या बहाण्याने पलायन केले होते. त्यामुळे पोलीस ठाण्यात मोठी खळबळ उडाली होती. पोलीस स्टेशन मधून फरार झालेल्या आरोपीला तातडीने ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान चंदनझिरा पोलिसांसमोर उभे असतांना पोलीस निरीक्षक यशवंत जाधव,स.पो.नि. संदीप सावळे,पोलीस उप निरीक्षक प्रमोद बोंडले,पोलीस कर्मचारी साई पवार,अनिल काळे,नंदलाल ठाकूर, चंद्रकांत माळी,यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी पळून गेलेल्या आरोपीचा माग काढत आज शुक्रवारी रात्री उशिरा जालना तालुक्यातील इंदेवाडी येथे जेरबंद करण्यात आले आहे.आरोपी पळून गेल्याचे लक्षात येताच ठाण्याचे पथक तयार करून सर्व परिसर पिंजून काढला होता अखेर रात्री याला यश आले.