जालना : समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा येथे मागील आठवड्यात झालेल्या अपघातानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून खबरदारी घेतली जात असून, गुरुवारी विशेष मोहीम राबवून २१८ बसेसची तपासणी करण्यात आली. त्यात प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या ३५ ट्रॅव्हल्स मालकांवर कारवाई करण्यात आली आहे. शिवाय, २३६ चालकांची ब्रेथ ॲनालायझरने तपासणी करण्यात आल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.
सुरक्षित बस प्रवासासाठी आरटीओ कार्यालयाने कंबर कसली असून, गुरुवारी विशेष मोहीम राबवून ट्रॅव्हल्सची तपासणी करण्यात आली. ही तपासणी दोन पथकांमार्फत सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.या मोहिमेत २१८ बसेसची तपासणी करण्यात आली आहे. त्यात आपत्कालीन दरवाजामध्ये अडथळा, प्रथमोपचार पेटी नसणे, अग्निशमन यंत्रणा नसणे आदी सुरक्षा बाबी नसलेल्या ३५ ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यात आली. शिवाय, बस चालविणाऱ्या २३६ चालकांची ब्रेथ ॲनालायझर यंत्राद्वारे मद्यपान तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ७१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ४५ हजार ५०० रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे.
ज्या प्रवासी बसेसमध्ये आपत्कालीन दरवाजाजवळ अडथळा झाला होता, तो अडथळा दूर करण्यात आला. ही तपासणी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी निरीक्षक हनुमंत सुळे, उदय साळुंखे, नितीन पी. पाटील, नितीन एस. पाटील सर्व सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी केली आहे.