लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आयपीएलवर (इंडियन प्रिमियर लिग) या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोन प्रतिष्ठित सराफा व्यापाऱ्यांच्या मुलांसह तीन बुकींवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री मंठा चौफुली परिसरात छापा मारुन कारवाई केली. त्याच्याकडून महागडे मोबाईलआणि इतर साहित्य असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे सट्टेबहाद्दरात खळबळ उडाली आहे.शहरातील मंठा चौफुलीजवळील वसू हॉटेलसमोर दोन इसम राजस्थान रॉयल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या आयपीएल क्रिकेट सामन्यावर एसएमएस, व्हॉट्सअॅप माध्यमातून पैशाची बोली लावून होते. सट्टा मोबाईलवर लावून खेळत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या पथकाला मिळाली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने पंचासमोर याबाबत खात्री केल्यानंतर पोलिसांनी छापा मारुन सट्टा खेळणारे सागर आनंद सुराणा (२७) सराफागल्ली, आणि दीपक पारसचंद गादिया (२९) सराफा या दोघांना पकडून त्यांच्या ताब्यातून महागडे दोन मोबाईल जप्त केले.जप्त केलेल्या मोबाईलची तपासणी केली असता मोबाईलवर झालेले संभाषण, आणि एसएमएस, आणि व्हॉट्सअॅपव्दारे क्रिकेट सामन्यावर सट्टा (जुगार) खेळत असल्याचे तपासणीत आढळून आले. यामुळे सुराणा आणि गादीया ज्या बुकीसोबत सट्टा खेळत होते , त्या तीन बुकीवरही पोलिसांनी कारवाई करून सचिन फुलपगर (रा.दानाबाजार), हरीश राजपूत (रा. लोधी मोहल्ला), आणि गोविंद गुप्ता (रा. काद्राबाद) या तिघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकोन मुसक्या आवळल्या.पोलिसांनी अचानक केलेल्या या कारवाईमुळे क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणा-यांमध्ये धास्ती पसरली आहे. पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी यांच्या फिर्यादीवरुन जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार पाच जणाविरुध्द तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, कर्मचारी सॅम्युअल कांबळे, रंजित वैराळ, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, विलास चेके आदींनी कामगिरी केली.पोलिसांनी केला तंत्रज्ञानाचा वापरपोलिसांच्या तपास कार्यात आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. याच तंत्रज्ञानाचा वापर करुन मोबाईलवरुन सुरु असलेल्या या बेटींग (जुगार) पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.- एस. चैतन्य, पोलीस अधीक्षक, जालना
आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांविरुध्द कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 12:52 AM