लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : अंबड पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध फास आवळायला सुरुवात केली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत अवैध वाळू उपशाचे चार ट्रक जप्त करण्यात अवैध दारू विक्रेत्यावरही पोलिसांनी कारवाई केली.सोमवारी रात्री पोलीस निरीक्षक रफिक शेख यांच्या नेतृत्त्वात अंबड-जालना मार्गावर राणीउंचेगाव फाट्याजवळ पोलिसांनी वाळूने भरलेला एक हायवा पकडून चालक सिध्देश्वर ज्ञानोबा आर्दड (रा. राजाटाकळी) यास ताब्यात घेतले. घनसावंगी फाटा येथे सहा ब्रास वाळूने भरलेला हायवा पोलिसांनी अडविला. पोलिसांना पाहताच चालकाने पोबारा केला. अंबड-जालना रोडवरील पारनेर फाटा एका हायवा चालक किशोर पारधे (रा. वलखेडा) यास ताब्यात घेतले. अंबड-घनसावंगी रोडवरील ताडहादगाव फाटा येथील एक अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक ताब्यात घेतला. मात्र, चालक फरार झाला. विशेष पथकाने रात्रीतून ६० लाख रुपये किमतीचे चार हायवा ट्रक, ९६ हजार रुपये किमतीची २४ ब्रास वाळू, असा एकुण ६० लाख ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास तालुक्यातील सोनकपिंपळगाव येथे अवैध दारु विक्री होत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी गावातील संशयित दिगंबर बाबासिंग झनकवार याच्या ताब्यातून विदेशी दारुच्या नऊ हजार रुपये किमतीच्या ५८ बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. पोलीस निरीक्षक शेख रफिक यांनी सांगितले की, अवैध धंद्याविरोधातील मोहीम या पुढेही सुरू राहणार आहे. कुणी कायदा मोडत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही. या कारवाईत कॉन्स्टेबल हैदर शेख, संजय अजगर, संतोष हावळे, एम. बी. चव्हाण, एम. जे. गायके, संदीप कुटे, आय. एस. सय्यद, महेश खैरकर, शेख सलाम यांनी सहभाग घेतला.
वाळू माफियांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:35 AM