जालना : वीजचोरीविरोधात जिल्ह्यात महावितरणने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गेल्या आठ महिन्यांत आकडे टाकून तसेच मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या तब्बल ५२२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महावितरणच्या या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.
मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी परिमंडलातील छत्रपती संभाजीनगर व जालना या दोन्ही जिल्ह्यांत वीजचोरीविरोधात नियमित कारवायांबरोबरच प्रत्येक महिन्यात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय अभियंते व कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत. ज्या विद्युत वाहिनीवर वीजगळतीचे प्रमाण अधिक आहे, त्या भागात इतर भागातील कर्मचाऱ्यांनीही भाग घेऊन एकाचवेळी कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यानुसार परिमंडलातील प्रत्येक शाखेत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सलग काही दिवस केवळ वीजचोरीविरोधातील धडक मोहीम राबवण्यात येते. जालना जिल्ह्यातही मुख्य अभियंता डॉ. केळे यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षक अभियंता संजय सरग यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या मोहिमांत वीजचोरांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.
एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत जालना जिल्ह्यात तब्बल ५२२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या वीजचोरांनी ३ लाख ८७ हजार ३७६ युनिट विजेची चोरी केली आहे, ज्याची रक्कम ७१ लाख ५६ हजार ४९५ रुपये एवढी आहे. जालना शहर उपविभागात ४२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ९ लाख ७१ हजार १६५ रुपयांची ५३४०६ युनिट वीजचोरी केली. जालना ग्रामीण उपविभागात १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ९५ हजार २५० रुपयांची ४०९४ युनिट वीजचोरी केली. भोकरदन उपविभागात ४७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ५ लाख ९६ हजार ४७२ रुपयांची ३७९१४ युनिट वीजचोरी केली. जाफराबाद उपविभागात ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ६३ हजार ७१३ रुपयांची ५३११ युनिट वीजचोरी केली. अंबड उपविभागात १२२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी १४ लाख ३१ हजार ९४८ रुपयांची ८२५२९ युनिट वीजचोरी केली. घनसावंगी उपविभागात ९९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी १५ लाख ५ हजार ५३८ रुपयांची ७६१८२ युनिट वीजचोरी केली. मंठा उपविभागात ९५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ९ लाख ९० हजार ७३० रुपयांची ४१८४१ युनिट वीजचोरी केली. परतूर उपविभागात ९९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी १५ लाख १ हजार ६७९ रुपयांची ८६०९९ युनिट वीजचोरी केली.