लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एकदा कढईत खाद्यपदार्थ तळण्याकरिता घातलेल्या तेलाचा वारंवार वापर केला जात असल्याची बाब सर्वत्र पाहावयास मिळते. हा नागरिकांच्या जीविताशी खेळच आहे. हीच बाब लक्षात घेत अन्न प्रशासन विभागाकडून वारंवार तेलाचा वापर करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टारंट चालकांवर कारवाई होणार आहे.शहरातील चौकाचौकांमध्ये फास्ट फूड व जंक फूडचे स्टॉल लागलेले आहेत. त्यांच्यासह हॉटेल, रेस्टॉरंट आणि फेरीवाल्यांकडे खाद्यपदार्थ तयार करताना तेलाचा मोठ्या प्रमाणात पुनर्वापर होतो.एकदा पदार्थ तळण्यासाठी घातलेले तेल वारंवार वापरणे आरोग्याकरिता हानिकारक असल्याने १ मार्चपासून शासनाने जळालेल्या तेलाच्या वापरावर निर्बंध आणले आहेत. भारतीय फूड सेफ्टी स्टँडर्ड अॅथॉरिटीच्या सूचनेवरून सदर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा हॉटेलमध्ये वारंवार खाद्यपदार्थ तळण्याकरिता त्याच त्या तेलाचा वापर नियमबाह्य ठरतो.जिल्ह्यात ६०० पेक्षा जास्त लहान-मोठे हॉटेल व खाद्यपदार्थांचे रेस्टॉरंट आहेत. तसेच अनेक हात गाड्यांवर खाद्यपदार्थ तयार केले जातात. पुनर्वापर केलेल्या तेलाने तळलेले खाद्यपदार्थ सेवन करणे, आरोग्याकरिता अतिशय हानिकारक असून, यासंदर्भाचा कायदेशीर नियम लागू झाला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देशही शासनाने अन्न व प्रशासन विभागाला दिले आहेत.त्यामुळे यापुढे दररोज ५० लिटर तेल वाटपाचा सर्व हॉटेल्स व रेस्टारंट धारकांनी तेलाच्या नोंदी ठेवणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.दरम्यान, या नियमांचे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सा. ए. देसाई यांनी केले आहे.हॉटेलांना ठेवाव्या लागणार नोंदीखाद्यपदार्थ तळण्यासाठी तेलाचा पुनर्वापर आरोग्यासाठी घातक आहे. एक किंवा दोनदा वापरल्यावर जळालेल्या तेलात ट्रान्सफॅट ( घातक मेद, चरबी) मोठ्या प्रमाणात तयार होते. त्याचे सातत्याने सेवन केल्यास हृदयविकार तसेच मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका बळावतो, असे तज्ज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. यामुळे फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी आॅफ इंडियाच्या सूचनेवरून सरकारने १ मार्च २०१९ पासून खाद्यतेलाच्या पुनर्वापराबाबत नवे नियम लागू केले आहेत. हॉटेल वा रेस्टॉरंटमध्ये यापुढे खाद्यपदार्थ तळण्यासाठी तेलाचा पुनर्वापर करता येणार नाही. दिवसाला ५० लिटरपेक्षा अधिक खाद्यतेलाच्या वापर करणारे हॉटेल तेलाच्या वापराचे रेकॉर्ड ठेवतील. खाद्यतेलाची खरेदी, त्याचा किती प्रमाणात वापर केला. वापरलेले तेल पुन्हा तळण्यासाठी घेतले आहे का, यासंदर्भातील माहिती ठेवावी लागणार आहे.पुनर्वापर तीन वेळापेक्षा जास्त नकोतेलाचा पुनर्वापर वारंवार झाल्यास पॉलिमरायझेशन प्रक्रिया होऊन तेलातील पोलर कंम्पाऊंडचे प्रमाण वाढते. तेलात हे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा अधिक नको, असा हा नवीन नियम आहे.काय होणार कारवाई ?यामध्ये विनापरवाना तसेच मोठे परवानाधारक खाद्यपदार्थ निर्माते आणि उत्पादकांना २ लाख रुपये दंड होणार आहे. ज्यांची नोंदणी आहे व १२ लाख रुपयांच्या आत वार्षिक उलाढाल आहे, त्यांना १ लाख रुपये दंड होणार आहे. आरोग्यास धोका झाल्याचे निष्पन्न झाले किंवा कुणाच्या जीवितास हानी पोहोचली तर तुरुंगातही जावे लागेल. ज्या हॉटेल आणि खाद्यपदार्थ निर्मितीच्या ठिकाणी दररोज किमान ५० लिटर खाद्यतेलाचा वापर होतो.
खाद्य तेलाचा वारंवार वापर केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:27 AM