लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील बसस्थानक परिसरातील लोहार गल्ली येथील सराईत गुंड विकी उर्फ तान्या नारायण जाधव (२०) याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.त्याला बेड्या ठोकून औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी ही कारवाई केली. एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाईची तिसरी घटना आहे.लोकसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर नजर ठेवून कारवाई करण्यात येत आहे. शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न, पोलिसावर हल्ला करणे, शिवीगाळ, मारहाण, जिवे मारण्याची धमकी देणे आदी स्वरुपाचे गुन्हे आरोपी आरोपी विकी उर्फ तान्या नारायण जाधव याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद आहेत. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी २२ मार्च रोजी त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्याकडे पाठविला होता, पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईचा प्रस्ताव गेला होता. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी २२ मार्च रोजी त्याच्यावर कारवाईचे आदेश दिले.त्यानुसार शनिवारी पोलिसांनी कारवाई करुन आरोपी तान्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दहशत पसरविणा-या गुंडावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. यामुळे एमपीडीए कायद्याअंतर्गत आतापर्यंत ऋषी जाधव, वाळू माफिया रवी ढाले, त्यानंतर तान्या जाधव या तिघांवर कारवाई करण्यात आली आहे.
एमपीडीए कायद्याअंतर्गत एकावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:33 AM