लोकमत न्यूज नेटवर्कजालना :जालना, परतूर व मंठा तालुक्यातील १७६ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या वॉटरग्रीड योजनेअंतर्गत पाइप अंथरण्याची कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. या कामात दिरंगाई करणा-या अधिकारी, कर्मचा-यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.वॉटरग्रीड योजनेच्या कामासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमांतर्गत या योजनेच्या कामासाठी २३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, काही निधी प्रत्यक्ष कामांवर खर्च झाला आहे. पावसाळयामध्ये शेती मशागतीची कामे सुरु होत असल्याने पाईपलाईन अंथरण्यासाठी खोदकाम करताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे या प्रकल्पांतर्गत पाईपलाईन अंथरण्याचे काम जूनपूर्वी करण्यात यावे. या योजनेंतर्गत झालेल्या कामांची तपासणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठाणे यांच्या गुणवत्ता पथक तसेच उस्मानाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत करण्यात येणार आहे. गुणवत्ता पथकाने दर्शविलेल्या त्रूटींची पूर्तता तातडीने करण्याचे निर्देश देत ही कामे गुणवत्तापूर्णच झाली पाहिजेत, अशा सूचनाही लोणीकर यांनी बैठकीत दिल्या. या वेळी गुणवत्ता पथकातील अधिका-यांनी योजनेच्या कामासंदर्भात उपयुक्त सूचना मांडल्या. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता लोलापोड, ठाणे येथील गुणवत्ता पथकाती ल अधीक्षक अभियंता मनीषा पलांडे, गुणवत्ता पथकाचे कार्यकारी अभियंता भालेराव, निम्न दुधना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता बनसोडे, परतूरचे उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील उपअभियंता कानडे आदींची उपस्थिती होती.
वॉटरग्रीडच्या कामात हयगय केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 12:47 AM