नेर : जालना तालुक्यातील नेर येथे ग्रामीण रुग्णालयात जिल्ह्यामधील पहिली महिला रुग्णवाहिका चालक म्हणून माधुरी गरुड रुजू झाल्या आहेत. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय वाकोडे यांनी गरुड यांचा सत्कार केला, गरुड यांची रुग्णवाहिका चालक म्हणून नियुक्ती हे महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय वाकोडे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी डॉ. राठोड, डॉ. चव्हाण यांची उपस्थिती होती.
‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धरी’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे. चूल आणि मूल यावर मर्यादित न राहता रुग्णवाहिका चालकाची कामगिरी देखील सक्षमपणे महिला पार पाडत असल्याचे आता दिसणार आहे. एखादी महिला रुग्णवाहिका चालवत आहे हे दृश्य खेड्यापाड्यात नाही, परंतु आता थेट रुग्णवाहिकेचे सारथ्य करताना एक महिला दिसणार आहेत. ग्रामीण रुग्णालयाच्या सेवेमध्ये महिला चालक रुजू झाल्या असून नुकतेच माधुरी गरुड यांनी रुग्णवाहिका चालवून एका नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.
चालक पदाची संधीनेर येथे ग्रामीण रुग्णालयात माधुरी गरुड या चालक म्हणून रूजू झाल्या आहेत. यामुळे गर्भवती महिलांसह इतर रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचे काम गरुड या करणार आहेत. जिल्ह्यात प्रथमच एक महिला रुग्णवाहिका चालक म्हणून रुग्णांची सेवा करणार आहेत. चालक पदावर रूजू झाल्यानंतर माधुरी गरुड यांनी महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
या कामात समाधानी आहे कोरोना काळामध्ये झालेले रुग्णांचे हाल पाहावत नव्हते. रुग्णवाहिका किंवा खासगी वाहने रुग्णांना नेण्यासाठी वेळेवर मिळत नव्हते. त्यामुळे डोळ्यादेखत अनेक रुग्ण दगावताना पाहिली. यामुळे मी देखील वैद्यकीय क्षेत्रात येऊन रुग्णसेवा करण्याचा निश्चय केला होता. चालकपदी नियुक्ती झाल्यामुळे मला रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळेल. मला हे काम करताना समाधान वाटत आहे.- माधुरी गरुड, रुग्णवाहिका चालक.