डॉ. शिवहरी साळवे : हिवरा काबली येथे किशोरवयीन संघ बैठकीचे आयोजन
टेंभुर्णी : किशोरवयीन मुला-मुलींनी वाढत्या वयासोबत शरीरात होणाऱ्या शारीरिक, मानसिक बदलांबाबत जागरूक राहून आरोग्य व आहाराची योग्य ती काळजी घ्यावी. यासाठी आरोग्य केंद्रावर स्थापित मैत्री क्लिनिकचा लाभ घेऊन आपल्या समस्या सोडवाव्यात, असे आवाहन हिवराकाबली उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शिवहरी साळवे यांनी केले. ते बुधवारी उपकेंद्रात आयोजित किशोरवयीन मुलांच्या संघ बैठकीत मुला-मुलींना मार्गदर्शन करीत होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ. साळवे म्हणाले की, किशोरवयीन मुला-मुलींच्या शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत असे अनेक प्रश्न असतात की, त्याबाबत त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. यासाठी मैत्री क्लिनिकच्या माध्यमातून या प्रश्नांची उकल सहज आपणास होऊ शकते. त्याठिकाणी मुलांना व मुलींना स्वतंत्ररीत्या मार्गदर्शन केले जाते. यासाठी १० ते १९ वयोगटातील मुला-मुलींनी मैत्री क्लिनिकशी मैत्री करावी, असेही ते म्हणाले.
यावेळी बालविवाह कायदा, लैंगिक शिक्षण, लग्नपूर्व समुपदेशन, मासिक पाळीतील स्वच्छता व सॅनिटरी पॅडचा वापर आदींबाबतीत मुलींना स्वतंत्ररीत्या मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मुलींना किशोर दैनंदिन पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. या बैठकीला राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रमाचे समुपदेशक मल्हारी उमाप, सागर दांडगे, मुख्याध्यापक जे.यू. सौदर, आरोग्य सेविका एम. के. हिरेकर, एस. टी. देशमुख, शिक्षक यू. आर. खंदारे, आशा वर्कर सुनीता म्हस्के, वैशाली भदर्गे, रंजना आव्हाड, संगीता मुरकुटे, मीरा बारगळ, शोभा उगले आदींसह मुला-मुलींची उपस्थिती होती.
फोटो
जाफराबाद तालुक्यातील हिवरा काबली येथील उपकेंद्रात आयोजित किशोरवयीन संघ बैठकीत मार्गदर्शन करताना समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शिवहरी साळवे व इतर.