- योगेश मोरेसेलगाव : शेती कसताना अनेक संकटे येतात. परंतु, यावरही मात करीत नियोजनबद्ध शेती केली तर लाखोंचे उत्पन्न मिळविता येते याची प्रचिती चितोडा (ता. बदनापूर) येथील युवा शेतकरी राहुल दिघे यांच्याकडे पाहिल्यानंतर येते. दिघे यांनी चालू वर्षात दोन एकर शेतात मिरची, कारले, टोमॅटो आणि दोडक्यांचे उत्पादन घेऊन सहा लाखांचा नफा मिळविला आहे.
चितोडा येथील शेतकरी राहुल अशोकराव दिघे हे गत सहा वर्षांपासून भाजीपाला पिकवत आहेत. २० एकर शेतीपैकी २ एकर क्षेत्रामध्ये बाराही भाजीपाला पिकविला जातो. प्रामुख्याने मेथी, कोथिंबीर, टोमॅटो, कारले, शिमला मिरची, काकडी, दोडके या भाजीपाला पिकांचे ते उत्पन्न घेतात. भाजीपाला पिकवताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ते करीत आहेत. यावर्षी त्यांना मिरची, कारले, टोमॅटो व दोडके या पिकांचा सरासरी उत्पन्नातून ६ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यासाठी जवळपास खर्च हा १० लाख रुपये झाला आहे. उत्पन्न चांगले असले तरीही बदलत्या हवामानामुळे भाजीपाला पिकावर परिणाम होतो. तापमान वाढीमुळे भाजीपाला पिवळा पडतो तर अचानक ढगाळ वातावरण झाल्यामुळे रोगराई वाढते.
दोघे बंधू कृषी पदवीधारकराहुल दिघे आणि त्यांचा मोठा भाऊ अरुण दिघे हे दोघेही कृषी पदविकाधारक आहेत. त्यामुळे शेतीतील नवनवीन प्रयोग करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. यामध्ये त्यांना त्यांचे वडील अशोकराव दिघे यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते.
म्हणून पाणी कमी लागते, गवतही कमी येतेभाजीपाल्यासाठी ते मल्चिंग, बेड पद्धतीचा ते प्रामुख्याने वापर करतात. मल्चिंगमुळे पाणी कमी लागते, रोगप्रतिकारक क्षमता वाढते, गवत कमी प्रमाणात होते तसेच जास्त काळ ओलावा टिकून राहतो. शेडनेटचा देखील ते वापर करतात. योग्य ती खताची मात्रा देतात तसेच योग्य ती फवारणी देखील करतात. यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन हाती पडते.
पन्नास टक्के नफामागील सहा वर्षांपासून आम्ही भाजीपाला पीक घेत आहोत. भाजीपाला उत्पादनासाठी विशेष नियोजन करावे लागते. कोणतीही एकच भाजी न पिकवता सोबत तीन ते चार पिके घेतली जातात. त्यामुळे एखाद्या भाजीपाल्याचा बाजारभाव कमी झाला तरी बाकी भाजीपाला पिकातून आम्हाला उत्पन्न मिळते. योग्य बाजारभाव मिळाल्यास कोणत्याही भाजीपाला पिकाला खर्च वजा करता पन्नास टक्के नफा हा आहेच.- राहुल दिघे, शेतकरी