लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सर्वसामान्यांना मोबाईलवर फोन करून फसविणाऱ्या महाठगांनी आपला मोर्चा कायदेतज्ज्ञ वकिलांकडे वळविला आहे. जालना येथील एका वकिलाला खोटी माहिती देऊन फीस देण्याच्या नावाखाली एक लिंक पाठविण्यात आली होती. मात्र, हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच त्या वकिलांनी पोलीस अधीक्षकांकडे कारवाईबाबत तक्रार दिली आहे.सर्वसामान्यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून खोटी माहिती देऊन, विविध आमिषे दाखवून बँक खात्यातून रक्कम काढल्याच्या अनेक घटना आहेत. अशाच प्रकारे शहरातील अॅड. महेश धन्नावत यांना एका व्यक्तीने संपर्क साधला. आपण जम्मू-काश्मीरमध्ये मिल्ट्रीत कार्यरत असून, माझी पत्नी जालना येथे राहते. मुलगा २३ वर्षाचा व मुलगी २० वर्षाची असून, त्यांचा विवाह आर्य समाज किंवा रजिस्टर्ड पध्दतीने लावणे गरजेचे असल्याचे सांगितले. बँक खात्याची माहिती घेऊन फीसची रक्कम खात्यावर भरतो असे सांगितले. तसेच गुगल पे असेल तर त्यावर कॅश फ्री १० रूपये अगोदर पाठविला जातो. त्यातून आपल्या खात्यातून दहा रूपये वजा होतात आणि काही काळात २० रूपये जमा होतात असे सांगण्यात आले. तसेच फीसबाबत लिंक पाठविल्याचे त्यावर क्लिक केल्यानंतर खात्यात पैसे जमा होतील, असे सांगितले. मात्र, हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे अॅड. धन्नावत यांच्या लक्षात आले. त्यांनी औरंगाबादसह इतर ठिकाणच्या विधिज्ञ मित्रांना संपर्क साधून माहिती घेतली असता त्या मित्रांनाही अशाच प्रकारचे फोन आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विधिज्ञांची फसवणूक करणाºया या टोळीवर कारवाई करावी, अशी मागणी अॅड. महेश धन्नावत यांनी पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.नागरिकांनी दक्षता घ्यावीअनोळखी व्यक्ती मोबाईलवर संपर्क करून विविध आमिष दाखवित बँक खात्याची माहिती मागत असेल तर देऊ नये. शिवाय एखाद्या लिंकवर क्लिक करण्याबाबत सांगत असेल तर करू नये. अशा प्रकारे माहिती गोळा करून आपली फसवणूक केली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता योग्य ती दक्षता घ्यावी, असे अॅड. महेश धन्नावत यांनी सांगितले.
ठगांच्या निशाण्यावर वकील!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 12:55 AM