सय्यद इरफान ।लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : गरीब, सर्वसामान्य विद्यार्थिनींना मागील २८ वर्षांपासून केवळ एक रूपया उपस्थिती भत्ता मिळत आहे. या तुटपुंज्या भत्त्यात वाढ करण्याकडे मात्र शिक्षण विभागासह शासनाचे दुर्लक्ष होत आहे.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. मुलींना शिक्षणाची दारे खुली करून क्रांती घडविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कालावधीतच उपस्थिती भत्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने ३ जानेवारी १९९२ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी विद्यार्थिनींसाठी उपस्थिती भत्ता योजना सुरू केली.प्राथमिक शाळेतील मुलींची उपस्थिती वाढावी म्हणून पहिली ते चौथीमधील जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषदेमार्फत चालविल्या जाणा-या शाळांमधील आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जाती आणि विमुक्त जमातीमधील विद्यार्थिनींना एक रूपया उपस्थिती भत्ता देण्यात येतो. पूर्वी ग्रामीण भागात मुलीच्या शाळेतील उपस्थितीचे प्रमाण फार कमी होते. पालकांचाही मुलींना शिकविण्याकडे कल कमी होता. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने मुलींसाठी उपस्थिती भत्ता योजना सुरू केली. यासाठी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थितीची अट लागू करण्यात आली. शैक्षणिक वर्षासाठी दर दिवसाला एक रुपयाप्रमाणे २२० रूपयापर्यंत उपस्थिती भत्ता दिला जातो. योजनेला २८ वर्षे उलटली आहेत. मात्र, एकीकडे वेतन आयोग लागू होत असताना दुसरीकडे मात्र, विद्यार्थिनींच्या उपस्थिती भत्त्यात छदामही वाढ करण्यात आलेली नाही.वेतन आयोग लागू व्हावा, पेन्शन योजना सुरू व्हावी, यासाठी आवाज उठविणाºया शिक्षक संघटनांनी गरीब विद्यार्थिनींच्या उपस्थिती भत्त्यात वाढ व्हावी, यासाठी आवाज उठविण्याची गरज आहे.जिल्ह्यात अनेक संघटना आहेत. या संघटनांनी एकत्रित येऊन लढा उभा करावा, शासनाला मुलींचा भत्ता वाढविण्यासाठी भाग पाडावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
२८ वर्षानंतरही शालेय मुलींना एक रूपया भत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 1:02 AM