लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्प हा गुजरातला नेण्याऐवजी तो मराठवाड्यात आणावा अशी भूमिका घेऊन एक मे रोजी मराठवाडा अनुशेष निर्मूलन व विकास मंचाच्यावतीने या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. हा प्रकल्प मराठवाड्यात आणताना त्याचा चौफेर अभ्यास करूनच तो आणण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी राजकीय मतभेद दूर ठेवून सर्वांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे मान्यवरांनी आपल्या विचारातून सांगितले.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभाृहात नाणार प्रकल्पा बाबत मराठवाडा अनुशेष निर्मूलन व विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील यांनी केले होते. याचे उद्घाटन मराठवाडा जनता परिषदेचे अध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल या होत्या. यावेळी कामगार नेते उध्ध्दव भवलकर, माजी मंत्री डॉ. शंकरराव राख, माजी आ. कल्याण काळे, माजी आ. कैलास गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, विमल आगलावे, गणेशलाल चौधरी, अॅड. विनायक चिटणीस, साईनाथ चिन्नादोरे, अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, अंकुशराव देशमुख आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी उध्दव भवलकर यांनी सांगितले की, मराठवाड्यावर कायम अन्याय झाला आहे. मात्र त्यासाठी आपल्यामध्ये देखील एकी हवी, कुठल्याही मुद्यावर एकत्रित येऊन प्रथम त्याचा सर्व बाजूंनी अभ्यास करून एक अजेंडा ठरवून त्याचा पाठपुरावा करण्यााची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी अॅड. प्रदीप देशमुख यांनी हा प्रकल्प गुजरातला नेण्याच्या हालचाली म्हणजे महाराष्ट्रावर अन्यायच आहे. तसेच होऊ नये यासाठी संघर्ष करावा लागेल. तसेच हा प्रकल्प मराठवाड्यात आणताना त्याचा वैज्ञानिक तसेच पर्यावरणीय संदर्भाने अभ्यास करूनच निर्णय होणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.विनित साहनी, साईनाथ चिन्नादोरे, प्रा. बाबा उगले, माजी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आदींनी विचार मांडले. प्रास्ताविक संयोजक संजय लाखे पाटील यांनी केले.त्यांनी यावेळी नााणर प्रकल्प हा मराठवाड्यासाठी कशी संजीवनी ठरू शकते याची अनेक उदाहरणे देऊन केले. हा प्रकल्प मराठवाड्यात आल्यास त्यातून तीन लाख कोटी रूपयांची गुंतवणूक होऊ शकते असेही लाखे पाटील यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र राख, राजेंद्र गोरे, संजीव देशमुख, माऊली कदम, अॅड. शैलेश देशमुख यांनी परिश्रम घेतले.
चौफेर अभ्यासानंतरच नाणार प्रकल्प मराठवाड्यात आणावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 1:25 AM