लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन, दानापूर : भोकरदन तालुक्यावर यंदा वरूणराजा प्रसन्न आहे. शेलूद येथील धामणा तसेच पद्मावती आणि जुई धरणात समाधानकारक साठा आल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. जुई धरणाच्या आन्वा, उंडणगाव, गोळेगाव, वाकडी, पणवदोड आदी कॅचमेंट भागात मोठा पाऊस झाला. त्याचा परिणाम जुई धरण सोमवारी मध्यरात्री ओव्हर फ्लो झाले.गेल्या महिन्याभरात भोकरदन तालुक्यातील उत्तरेकडील भागात दमदार पाऊस झाला. या चा परिणाम म्हणून केलेली जलसंधारणाची कामे ही वरदान ठरली आहेत. जलयुक्त शिवार योजनेसह वॉटर कप आणि समस्त महाजन ट्रस्टने या तालुक्यात मोठे काम केले. गाळ काढण्याच्या या उपक्रमामुळे यंदा पाणीसाठा वाढणार आहे. जुई धरण भरल्याने परिसरातील चारशे हेक्टरला मोठा लाभ होणार असून, जवळपास २५ गावांचा पाणीप्रश्न यामुळे मिटला आहे. दानापूरसह पारध जवळील पद्मावती धरणातही ८० टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.धामणा धरणाच्या सांडवण्यातून जास्तीच्या पाण्याचा विसर्ग सुरू असून, धरण फुटण्याची आता कुठलीच चिन्ह नसल्याचे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे घाबरून जाऊ नये असे आवानही यावेळी अधिकाऱ्यांनी केला आहे. या धरणाचे बांधकाम १९५७ मध्ये सुरू होऊन १९६२ साली पूर्ण झाले.संरक्षण भिंतीची लांबी दीड किलोमीटर पर्यंत दगड व सिमेंटमध्ये बांधण्यात आली आहे. परंतू काटेरी झाडांमुळे संरक्षण भिंतीही पूर्ण जीर्ण झालेल्या आहेत.सिंचन : पाणीप्रश्न सुटल्याने समाधानगेल्या काही वर्षापासून कोरडीठाक असलेली ही धरणे पावसाळ्याच्या पहिल्याच फटक्यात भरली आहेत. आणखी पाऊस पडण्याची मोठी नक्षत्र शिल्लक आहेत. त्यामुळे ही धरणे भरल्यानंतर ती फुटण्याची भिती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. परंतु, सांडवे असल्याने धरण फुटणार नाही असे सांगण्यात आले.
धामणानंतर जुई धरण भरले तुडुंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:40 AM