तीर्थपुरी ( जालना) : मराठा आरक्षण मिळत नसल्याच्या भावनेने व्यथित होऊन घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथील शिवाजी अण्णाकिसन माने (45) याने टोकाचे पाऊल उचलले. आज सकाळी साडेअकरा वाजता राहत्या घरामध्ये गळफास घेऊन माने याने आत्महत्या केली.
प्राथमिक माहिती अशी की, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेवरून आंतरवाली टेंभी येथे आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. सकाळी शिवाजी माने या तरुणाने साखळी उपोषणात सहभाग घेतला. मात्र, दुपारी घरी गेल्यावर राहत्या घरात रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, 40 दिवसाचा कालावधी जाऊनही आरक्षण न मिळाल्याने साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. तरीही आरक्षण मिळते की नाही, असे म्हणून शिवाजी माने यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील पत्नी दोन मुलं एक मुलगी असा परिवार आहे.