कुंभार पिंपळगाव : कुंभार पिपळगाव येथून मंगळवारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी बसची वाट पहात थांबल्या होतत्या. बस आल्यानंतर चालक-वाहकाने बसमध्ये बसण्यास नकार दिल्याने या विद्यार्थिनींनी आंदोलन करत चालक-वाहकाला बसमध्ये बसू देण्यास भाग पाडले.कुंभार पिंपळगाव ते परतूर (एम. एच. ०६ एस ८७४९) या बसने जांब समर्थ, विरेगव्हानला जाण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनीना चालक-वाहकाने बसमध्ये घेण्यास नकार दिला. यानंतर संतप्त विद्यार्थिनींनी बससमोर उभे राहून काहीकाळ आंदोलन केले. हे आंदोलन सुरू असताना ग्रामस्थांचा मोठा जमाव येथे जमला. यातील काहींनी चालक, वाहकाला याबाबत विचारणा केल्यानंतर ही बस मानव विकासची बस नसून, प्रवाशी बस आहे. यामुळे या बसमध्ये विद्यार्थ्यांना घेता येणार नसल्याचे सांगितले. परंतु विद्यार्थिनींनी आक्रमक पावित्रा घेत आम्हाला बसमध्ये बसू दिल्याशिवाय आम्ही गाडी पुढे जाऊ देणार नाही, असे म्हणत रोडवर बससमोर उभ्या राहिल्या. आंदोलन आणि वाढता जमाव पाहता चालक-वाहकांनी माघार घेत विद्यार्थिनींना बसमध्ये बसविले. या आंदोलनात भेंडाळा, विरेगव्हाण, जांबसमर्थ येथील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.
विद्यार्थिनींच्या आंदोलनानंतर वाहक नरमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:19 AM