भोकरदन : वर्षभरापूर्वी फूस लावून पळवून नेलेल्या युवतीसह युवकाला भोकरदन पोलिसांनी १२ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने युवतीची तीन महिन्यांच्या बालकासह सुधारगृहात रवानगी केली, तर आरोपी युवकाची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
शहरातील एका अल्पवयीन मुलीला २७ सप्टेंबर २०२० रोजी औरंगाबादेतील एका युवकाने फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणात सागर ढगे (रा. निसारवाडी औरंगाबाद) याच्याविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र एक वर्षभरापासून युवकासह युवती पोलिसांच्या हाती लागत नव्हते. ते दोघे श्रीरामपूर येथे असल्याची माहिती सपोनि. रत्नदीप जोगदंड यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलशिग बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जोगदंड यांनी पथक नेमले. पथकातील उपनिरीक्षक सचिन कापुरे, एस. के. लोखंडे, जी. जे. सातवण, एन.पी. थिटे यांनी १२ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर येथून त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना जालना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तरुणीची बालकासह सुधारगृहात, तर युवकाची जिल्हा कारागृहात रवानगी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.