लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी संघटनेचे धरणे आंदोलन सुरु असतांना उपोषण स्थळाच्या मंडपाच्या वरुन गेलेल्या उच्च विद्युत वाहिनीतून आगीचे लोट निघाल्याने आंदोलनकर्त्यांची एकच धावपळ उडाली.जिल्हाधिकारी कार्यालयसमोर धरणे आंदोलन, उपोषण करण्यासाठी आंदोलन कर्त्यांना हक्काची जागाच नाही. सामाजिक न्याय भवनाच्या गेटसमोर असलेल्या जागेवर मंगळवारी उपोषण केले. विशेष म्हणजे या जागेवरुन उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे धरणे आंदोलन सुरु होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अण्णा सावंत यांचे भाषण सुरु असताना अचानक परिसरातील वृक्षाच्या फांदीचा स्पर्श झाल्याने विद्युत वाहिनीतून आगीचे लोट निघाले. आंदोलनस्थळी कापडाचा मंडप उभारण्यात आला होता. यामुळे मंडपाला लाग लागण्याच्या भीतीमुळे आंदोलनकर्त्या महिलांनी मंडळातून एकच धूम ठोकली. अशा स्थितीतही आंदोलन कर्त्यांनी मंडपाच्या बाहेर बसून आंदोलन सुरुच ठेवले.
आगीच्या लोटामुळे आंदोलनस्थळी गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 12:56 AM